अहिल्यानगर (प्रतिनिधी): पेमराज सारडा महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षणामध्ये महिलांचा सहभाग : प्रवेश, समता आणि शैक्षणिक नेतृत्व’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. हे चर्चासत्र शनिवारी (दि. 14) आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे महिला अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. निर्मला जाधव यांनी बीजभाषक म्हणून उपस्थित राहून महिलांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसंबंधी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या मागासलेपणामागील सामाजिक कारणांचा ऊहापोह करताना सांगितले की, स्त्रियांमध्ये क्षमता असूनही संधीअभावी त्यांचा विकास मर्यादित राहिला. ‘परक्याचे धन’ या मानसिकतेमुळे महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1975 ते 1985 हा कालावधी ‘महिला दशक’ म्हणून साजरा करण्यात आला होता. त्यानंतर महिलांच्या स्थितीचा अभ्यास करून विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या. मातृत्व आणि बालसंगोपन ही स्त्रियांसाठी मोठी जबाबदारी ठरत असल्याने कार्यस्थळी डे-केअर सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
द्वितीय सत्रात तज्ज्ञ साधन व्यक्ती म्हणून आयएमएससीडीआर, अहिल्यानगर येथील व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणोती तेलोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर भर देताना सांगितले की, प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. तसेच, स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरातूनच व्हावी, यासाठी बालपणापासून योग्य संस्कार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी प्रास्ताविक करताना स्त्री शिक्षणाचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी संत जनाबाई यांच्या अभंगाचा उल्लेख करून स्त्री शक्तीचे सामर्थ्य स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रमेश झरकर यांनी चर्चासत्राच्या विषयाचे महत्त्व सांगत महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मुलींच्या वाढत्या यशाचेही अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दया जेठे यांनी केले, तर प्रा. डॉ. स्वाती रोकडे यांनी आभार मानले. या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.


